शनिवार, १६ जुलै, २०१६

सोमनाथ - गिरनार यात्रा Somnath-Girnar yatra - एक दिव्य अनुभव, जून २-५, २०१६ (उत्तरार्ध- गिरनार दर्शन)

सोमनाथ - गिरनार यात्रा Somnath-Girnar yatra - एक दिव्य अनुभव, जून २-५, २०१६ (प्रथमार्ध - सोमनाथ  दर्शन) वाचण्यासाठी link  खाली देत आहे....

http://mohanayare.blogspot.in/2016/07/somnath-girnar-yatra.html

-:पुढे चालू:-

 'अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।'

प्रथमार्धात सोरटी-सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या गिरनार यात्रेला निघू. 

!!जय गिरनारी !!  

सोमनाथवरून ट्रेनने प्रवास करताना जुनागढ जसजसे जवळ येऊ लागते तास गिरनार पर्वताचा पहिला डोंगर दिसू लागतो. हो, आता 'पहिला डोंगर' असा विशेष उल्लेख करायचे कारण असे की एकूण २ डोंगर चढून उतरल्यावर गुरुशिखर (मुख्य दत्त मंदिर) ३ऱ्या डोंगरावर आहे! 



                             (छायाचित्र : 'तलेटी' गावातून दिसणारा गिरनार पर्वताचा 'पहिला' डोंगर )


जुनागढला उतरून टमटम रिक्षाने गिरनार पायथ्याशी असलेल्या 'तलेटी' गावात पोहोचता येते. या टमटम रिक्षाच्या प्रवासात हळूहळू जवळ येणारा गिरनार पर्वत दत्तदर्शनाची लालसा सतत वाढवत राहतो. 'तलेटी' गावात दत्त भक्तांची अतिशय माफक दरात राहण्याची सोय करणाऱ्या अनेक धर्मशाळा आहेत. दुपार-रात्रीच्या जेवणासाठी अनेक स्वस्त hotels आहेत. 

आम्ही संध्याकाळी ०६:००-०६:३० च्या सुमारास एक धर्मशाळेत उतरलो. गिरनार चढायला रात्री ११:०० वाजता सुरुवात करायची असल्याने हातात चांगले ४-५ तास होते. या वेळेचा सदुपयोग गिरनार पर्वताचे photos काढण्यासाठी आणि 'तलेटी' गावात फेरफटका मारण्यासाठी करायचे ठरले. 

'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिर हे आवर्जून दर्शन घ्यावे असे आहे. पूर्ण सोनेरी रंगाने रंगवलेले हे मंदिर रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या रंगबेरंगी प्रकाशयोजनेत विशेष खुलून दिसते. आणि रात्रीच्या वेळी पुन्हा दर्शनाला गेलो तेव्हा दोन्ही ओंजळीभर मिठाई-फळे असा प्रसाद भेटला. 



 (छायाचित्र : 'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिर ) 


                  (छायाचित्र : 'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिरातील जिवंत भासणारी दत्तमूर्ती) 



                      (छायाचित्र :रात्रीच्या प्रकाशयोजनेत उजळून निघालेले भवनाथ महादेव मंदिर )


रात्रीचे जेवण उरकून आम्ही गिरनार चढाईला सिद्ध झालो. प्रत्येकी ३ ली. पाणी, glucon-D, भरपूर सुका खाऊ आणि चॉकोलेट्स अशी जय्यत तयारी असलेली बॅग व हातात काठी सोबत घेतली. इथे भक्तांनी लक्षात घ्यावे की एकदा चढायला सुरुवात केली की वाटेत कोणतीही दुकाने, toilet अशा कोणत्याही सुविधा नाहीत. (वाटेत दुकाने आहेत, पण ती रात्रीची बंद असतात!)....त्यामुळे खाणे-पिणे सोबत घ्यायचे आणि बाकी नैसर्गिक विधी...'जंगलमे मंगल'!  


रात्री बरोबर १२ वाजता चढाईला सुरुवात केली. प्रत्येक पायरीबरोबर रात्रीच्या गारव्यातही अंग घामाने निथळून निघत होते. एकूणच mixed age group असल्याने चढणे हळूहळू होत होते. सोबत चालणाऱ्या प्रौढ भक्तांना दम लागत होता पण दत्त दर्शनाची आतुरता वरचढ होती. या सर्वांचा उत्साह पाहून आम्हा तरुणांनाचा उत्साहही द्विगुणित होत होता. 


थोड्याथोड्या अंतरावर थांबत पण अनिरुद्ध गतीने प्रवास चालू होता. रात्रीचा सुखद गारवा खूपच आल्हाददायक होता. हळूहळू जशी उंची वाढत गेली तास हवेतील गारवा वाढत होता. अंगावरचा घाम कधीच सुकून आता थंडीला सुरुवात झाली होती. जुनागढ railway stationवरून पाहिलेला पहिला डोंगर आता अर्ध्याअधिक चढून झाला होता. मागे वळून पाहता तलेटी आणि जुनागढ शहराच्या lights रात्रीच्या अंधारात दिसत होत्या.शरीराला instant energy  मिळावी म्हणून Glucon-D/चॉकोलेट्सचा खुराक चालू होता. एकमेकांना प्रोत्साहित करत, गाणी / गजर म्हणत, jokes मारत चढाई चालू होती. 


रात्रीचे धुके आता खाली दिसत होते, म्हणजे आम्ही ढगांच्या वरच्या पातळीला होतो. रात्रीच्या अंधुक प्रकाशात ते ढगांचे दृश्य अवर्णनीय होते. आणि ढगांच्यावरची उंची गाठणे ही achievement होती. एक डोंगर सर झाला होता आणि दुसरा समोर दिसायला सुरुवात झाली होती. ...थोडा वेळ थांबलो, ते दृश्य डोळ्यात साठवून मगच पुढे निघालो.  


आमच्याव्यतिरिक्त आणखीही काही groups चढाई करत होते. पण ते फार मागे राहिले होते. एका ठिकाणी असच विश्रांतीसाठी थांबलेलो असताना सिंहाचे गुरगुरणे स्पष्ट ऐकू आले. लगेच उठलो आणि चालायला लागलो. थरारक क्षण होता तो! पुढे थोडे चढल्यावर अंबाजी माता मंदिर, जैन मंदिर लागले. चढाईचा एक तृतीयांश भाग मार्ग मागे पडला होता. तिथून पुढचा चढाईचा खूप मोठा टप्पा दिसू लागला.(जो तलेटी गावातून दिसत नाही )


इथे आवर्जून सांगावेसे वाटते की रात्री चढाई करण्याचा फायदा हा की आपण किती अंतर चाललो आणि विषेशतः किती अंतर अजून पार पडायचेय याचा अंदाज रात्रीच्या अंधुक प्रकाशात येत नाही. त्यामुळे 'अरे अजून किती दूर चालायचेय?' या विचाराने येणार मानसिक थकवा जाणवत नाही! तसेच, तितकाच महत्त्वाचा मुद्दा हा की रात्रीच्या आल्हाददायक थंड वातावरणात शारीरिक थकवाही खूप कमी जाणवतो. दुपारच्या भर उन्हात हीच चढाई अनेक पटीने कठीण असते. 


पहाटेचा ब्रह्ममुहूर्त ०३:२० झाले. तेव्हा होतो त्या ठिकाणी थोडीशी उपासना केली. त्या प्रसन्न वातावरणात उपासना करायचा अनुभव मस्त होता. अंबाजी माता मंदिरासमोरील डोंगर पूर्ण चढून गेल्यावर थोडेसे खाली उतरायचे आहे. त्यानंतर 'गोरक्षनाथ टोक' असलेला डोंगर दिसू लागतो. त्याचा चढ पूर्ण चढलो. आता हवेतील गारवा चांगलाच वाढला होता, थंडी वाजायला सुरुवात झाली होती. रात्रीच्या अंधारात तिकडे असलेली गोरक्षनाथ गुंफा आणि लहानसे मंदिर नीट पाहता आले नाही . कारणही तसेच होते...समोर 'गुरुशिखर' दिसायला लागले होते! 


... तो आनंद अवर्णनीय होता! 

...पण, समोर दिसणारा डोंगरही खूपच उंच होता. आणि आम्ही उभे असलेला 'गोरक्षनाथ टोक' असलेला डोंगर पूर्ण उतरून तो 'गुरुशिखराचा' डोंगर चढायचा होता. हा शेवटचा टप्पा तीव्र उतार आणि लगेचच तीव्र चढ असा आहे. तरीही, 'दत्तबाप्पाने इतके करवून घेतले, आता हा टप्पाही 'तो'च पार करवून घेईल', हा दृढविश्वास होता.
आता गुरुशिखराचा डोंगर चढायला सुरुवात केली. थंडगार वाऱ्याबरोबर थकवा कुठच्या कुठे उडून गेला होता! दत्त दर्शनाची आतुरता पाऊला पाऊलाला वाढत होती. नकळत मुखी चाललेल्या जपाचा वेगही वाढला होता. 

रात्री १२:०० वाजता चढायला सुरुवात केलेली, आता पहाटे ०५:३०च्या सुमारास दत्तशिखरावर होतो. दत्त मंदिर ०६:००ला उघडते. ठरल्याप्रमाणे मंदिर उघडायच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो. आमच्या आधी १२-१५ भक्त रांगेत उभे होते. मंदिर उघडायला १५-२० मिनिटे वेळ होता. त्या वेळात आमच्याकडून दत्तमाला मंत्र, दत्तबावनी, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, 'ओम द्राम दत्तात्रेयाय नमः', 'अनसूयोत्रि संभूतो...' असे सर्व जप दत्तबाप्पाने करवून घेतले. आतून पूजा/ आरतीचा आवाज येत होता. 
  

 (छायाचित्र : पहाटेच्या प्रकाशात दिसणारा 'गुरुशिखराचा' डोंगर, P.C. vishalsinh khetle FB album) 


 (छायाचित्र : गोरक्षनाथ टोकावरून दिसणारे सूर्योदयाचे विहंगम दृश्य, P.C. vishalsinh khetle FB album) 

मंदिर त्या दिवशी १०मिनिटे आधीच उघडले. आम्ही आत गेलो. आकार पाहता, गिरनार गुरुशिखरावरील दत्तमंदिर एखाद्या societyतील देऊळही खूप मोठे वाटावे इतके लहान होते. पण, दत्तबाप्पाने १२,००० वर्षे केलेल्या तपश्चर्येने पावन झालेल्या त्या जागेची महती अपरंपार होती! तेथील पाषाणावर दत्तबाप्पाच्या पादुका उमटल्या आहेत. पादुकांमागे २-२ १/२ फूट उंच दत्तबाप्पाची लोभस मूर्ती आहे. आम्ही सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतले आणि लोटांगण घातले. दत्तबाप्पाच्या मूर्तीमागे लहानसे 'गुप्तेश्वर महादेव' नावाचे लहानसे शिवलिंग आहे. सर्व दर्शन ५-७ मिनिटात आटोपून इतर भक्तांबरोबर मंदिराबाहेरही पडलो.



                        (छायाचित्र : गिरनार गुरुशिखरावरील दत्तबाप्पाच्या पादुका , source internet)



              (छायाचित्र : गिरनार गुरुशिखरावरील दत्तबाप्पाच्या पादुका आणि मूर्ती, source internet)


गुरुशिखर मंदिरात आलेला विशेष अनुभव : 


मंदिरातून बाहेर पडताच मनात विचार आला 'अरे जिथे येण्यासाठी इतके कष्ट घेतले त्या दत्तबाप्पाच्या मंदिरातून इतक्या लवकर परतण्यात काय logic आहे?, अजून थोडा वेळ तरी नको का घालवायला?' ... मग काय आम्ही सगळे 'पीछे मूड' करून पुन्हा मंदिरात आलो. पुन्हा, शांतपणे दर्शन घेतले आणि लोटांगण घातले. दत्तबाप्पाच्या मूर्तीकडे आणि विशेषतः पादुकांकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. आता काय तिकडून पाय निघत नव्हता! इतक्या दूरचा प्रवास करून हा क्षण जगण्यासाठी तर आलो होतो! परतीची train रात्री पकडायची होती तसेच आमच्या group मधील बाकी सगळे मागे होते.घाई तरी कशा साठी करायची? ...मग काय, ज्याला जी सुचेल ती उपासना म्हणत राहिलो.


तिकडे असलेल्या पुजाऱ्याची मात्र अस्वस्थता वाढत चाललेली. एक तर आमच्यापैकी कोणी त्याला काही पैसे दिले नव्हते आणि कोणीही त्याच्या पाया पडले नव्हते. आम्ही इतर 'चांगल्या' भक्तांप्रमाणे दर्शन घेऊन निघत नव्हतो. आम्ही आमच्या आजोबाला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा येत होतो,जागेवरून हालत नव्हतो. त्यामुळे त्याचे चिडणे स्वाभाविक होते. असो, मग आम्ही कोपरे-आड जागा पकडून पण मंदिरातच हिय्या मांडून होतो.  


'मुखी जप, लक्ष चरणांकडे स्थिर' अशा अवस्थेत असतानाच तेथे कुठून कोण जाणे एक सर्पराज आला. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या मित्राच्या हे लक्षात आले. माझी आई आणि इतर काही काकू तिकडेच उभ्या होत्या म्हणून त्यांना इशारा देऊन आम्ही सावध केले. ते त्या सर्पराजापासून थोडे दूर झाले. पण तो सर्पराज वेगळाच agenda घेऊन आलेला होता. तो अतिशय संथ गतीने पुजाऱ्याच्या दिशेने सरकू लागला. तो पुजारी जणू अधिकारवाणीने हातातील लोटा आपटत "नागराज, चले जाओ नागराज" असे बोलू लागला. कदाचित 'नागराजही माझे ऐकतो' हे दाखवायचा तो प्रयत्न करत असावा. पण झाले उलटेच! त्याच्या त्या ओरडण्यामुळे आणि लोटा ठोकावण्याने तो सर्पराज अतिशय संथ गतीने त्या पुजाऱ्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागला. आता मात्र त्या पुजाऱ्याची तारांबळ उडाली.एका हाताने आपली लुंगी सांभाळत दुसऱ्या हाताने लोटा ठोकावीत तो आपल्या जागेवरून उठून त्या सर्पराजपासून दूर जाऊ लागला. "नागराज, चले जाओ नागराज!". अधिकारवाणी जाऊन आता त्याच्या आवाजात अगतिकता आली होती. मंदिरात असलेला एकमेव सुरक्षारक्षक त्याच्या मदतीला आला. नंतर तो सर्पराज त्याच्या त्याच अतिशय संथ गतीने दत्तबाप्पाच्या मूर्तीमागून गुप्तेश्वर महादेवाकडे सरकू लागला आणि त्या लिंगाभोवती स्थिरावला. 

हा प्रसंग इतका detail मध्ये वर्णन करायचे कारण इतकेच की या सगळ्या वेळात त्या कटकट करणाऱ्या पुजाऱ्याचे आणि सुरक्षारक्षकाचे पूर्ण लक्ष आमच्याकडून त्या सर्पराजाकडे divert झाल्यामुळे आम्हाला निर्घोरपणे सर्व उपासना शांतपणे करता आल्या, ही दत्तबाप्पाचीच करणी!

जवळपास २५-३०मिनिटे उपासना केल्यानंतर पूर्ण तृप्त मनाने आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलो.

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, आता नाही देव काही अन्य मागणे।।धृ।। 

हे गाणे वारंवार आठवत होते.'लवकरच परत घेऊन ये' हे दत्तबाप्पाला सांगायला आम्ही विसरलो नाही. 

बाहेर येऊन पाहतो तर आणखी एक अतिशय सुंदर देखावा आमची वाट पाहात होता. सूर्य उगवून पूर्ण उजाडले होते. मंदिरात जाताना अंधार असल्यामुळे आजूबाजूचा सुंदर परिसर नीट पाहता आला नव्हता. गुरुशिखराभोवतालचा सुंदर निसर्ग आता नजरेत मावत नव्हता. छोट्या छोट्या टेकड्यांवरून पुढे सरकणारे ढग एखाद्या मऊमऊ कापसाच्या बिछान्यासारखे भासत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने आकाशात लाल-पिवळ्या-भगव्या-निळ्या-जांभळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती. ते सुंदर दृश्य आमचे अधीर डोळे अधाशासारखे पीत होते. किती photo काढले पण समाधान काही होईना. कोणताही camera ती सुंदरता साठवून ठेवायला अपुरा होता. 'देवाने दिलेले डोळे हाच जगातील सर्वश्रेष्ठ camera आहे!', ही गोष्ट आज पुन्हा जाणवली. भरपूर photos काढून खाली यायला निघालो. 





                                            (छायाचित्रे: गुरुशिखराभोवतालचा सुंदर निसर्ग)


गुरुशिखराचा डोंगर उतरून आल्यावर खाली 'दत्तबाप्पाची अखंड धुनी' आहे. दर सोमवारी या धुनीत समिधा भरल्या जातात. थोड्या वेळाने या समिधा आपोआप पेट घेतात. आजही हा सोहळा दर सोमवारी 
सकाळी ७:०० वाजता अनुभवता येतो. याच ठिकाणी थोडे खाली उतरून गेल्यावर कमंडलू तीर्थ  आहे. या प्रदेशातील पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथील कमंडलू तीर्थ हाच पाण्याचा एकमेव स्रोत आहे. असे सांगितले जाते की तपश्चर्या चालू असताना दत्तबाप्पाने त्याच्या हातातील कमंडलू गुरुशिखरावरून खाली फेकला त्यामुळे जे तीर्थ तयार झाले तेच हे कमंडलू तीर्थ! एक छोटा झरा इथे वर्षभर वाहत असतो.तिकडच्या आश्रमातले सेवेकरी येणाऱ्या भक्तांना वर्षभर चहा आणि अल्पोपहार विनामूल्य देत असतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांची सेवा नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.


                                         (छायाचित्र: गोरक्षनाथ टोकावरून दिसणारे गुरुशिखर ) 


                                    (छायाचित्र: शेवटचा टप्पा तीव्र उतार आणि लगेचच तीव्र चढ ) 


                                                             (छायाचित्र: गिरनार पायऱ्या)


                                                  (छायाचित्र: गिरनार वाटेतील सुबक मंदिरे) 


(छायाचित्र: तलेटी आणि जुनागढ शहराचा देखावा ) 

मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री अंधारामुळे अंधुक दिसलेल्या गिरनार पर्वताच्या प्रदेशाचे सौंदर्य न्याहाळत, वाटेतील सुबक मंदिरे पाहत आम्ही उतरत होतो. वयोवृद्ध माणसांना गिरनार पर्वत दर्शन घ्यायचे असल्यास 'डोली'ची सोय आहे. जाऊन-येऊन वजनाप्रमाणे १०,०००-१५,००० रुपये ते घेतात. पण खरंच जिथे स्वतःला चढणे इतके कठीण आहे तिथे ५०-८० किलोच्या माणसांना घेऊन जाणारे डोलीवाल्यांच्या मेहनतीला सलाम! 

अखेर दुपारी १२:२० वाजता आम्ही पुन्हा पायथा गाठला. 'अवधूतचिंतन श्रीगुरुदेवत्त'चा जयघोष करून आम्ही आनंद साजरा केला. lunch करून roomवर आलो. गिरनार चढाई आणि उतरण्याचे प्रसंग आठवत होतो. गुरुशिखरावरील अनुभव एकमेकांना सांगत होतो. आंघोळ करून थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर भरपूरसा शीण निघून गेला. 

संध्याकाळी पुन्हा त्या भव्य गिरनार पर्वताकडे पाहताना मन भरून येत होते. हा एवढा मोठा पर्वत आपण चढून-उतरलो याबद्दल एकदा स्वतःचीच पाठ थोपटावी वाटल. दत्तबाप्पाने इतके करवून घेतले, म्हणून त्याला 'अंबज्ञ' म्हटले. संध्याकाळी ७:३० वाजता निघायचे होते. पण मन वळून वळून त्या भव्य गिरनार पर्वताकडे पाहत होते. 'पुन्हा तुला भेटायला येईनच, तूच घेऊन ये' असे मनोमन सांगत आम्ही टमटमने निघालो. एखाद्या माहेरवाशिणीसारख तो पर्वत दृढीआड होईपर्यंत त्याला वारंवार पाहत होतो. 

पुढे जुनागढ railway station जवळच एक हॉटेलात सुग्रास 'गुजराती थाळी' enjoy केली आणि रात्री ०९:१५ वाजताची 'सोमनाथ एक्सप्रेस' पकडली. 


                  (छायाचित्र : जुनागढ railway station जवळच एका हॉटेलातील सुग्रास 'गुजराती थाळी')

येतानाप्रमाणेच अहमदाबादला train बदलली आणि बांद्रा टर्मिनसला येणारी 'सयाजी नगरी एक्सप्रेस' पकडली.गाडीत वालसाडजवळ आंबे-चिकू यांची shopping झाली. रविवारी ५ जून दुपारी ०२:३० च्या सुमारास सर्व बांद्रा टर्मिनसला उतरले. एक groupie काढून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. सोमनाथ - गिरनार यात्रेच्या अनेक सुखद आठवणी घेऊन 'पुन्हा भेटू, पुढच्या गिरनार यात्रेला!' असे म्हणत आपआपल्या घरी परतलो.


                                                  (छायाचित्र : सोमनाथ - गिरनार यात्रा ग्रुप )

५ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर... आता माझीही खुप इच्छा झाली आहे गिरनारला जायची... अंबज्ञ...

    उत्तर द्याहटवा
  2. अंबज्ञ मित्र अप्रतिम. तुझा लिखाणाने पुन्हा एकदा गिरनारला आहे अस वाटलं. गुरुशिखरावर गेल्यावर दत्त बाप्पाकडे आमच्या Dad ला बर वाटू दे हे आवर्जून मागणं मागायचा विसरलो नाही आम्ही, खरंच तिथून पाय निघत न्हवता. स्वर्गात आलो आहे अस भासत होते. गुरुशिखर मंदिरात आलेला विशेष अनुभव अप्रतिम होता ती तर दत्तबाप्पाचीच कृपा. सगळंच काही अद्भुत होते. वारंवार गुरु चरणांचे दर्शन घेऊन मन तृप्त होत न्हवते पुन्हा एकदा दर्शनाची ओढ लागली आहे अंबज्ञ

    उत्तर द्याहटवा
  3. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.नर्मदे हर.प्रेरणा मिळाली.पुढच्या महिन्यात जायचे आहे गिरनार दर्शन परिक्रमा करण्यासाठी.मोरया मैया आणि श्रीगुरुदेव घेऊन जाणार आहेत.चिंता अजिबात नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.नर्मदे हर.प्रेरणा मिळाली.पुढच्या महिन्यात जायचे आहे गिरनार दर्शन परिक्रमा करण्यासाठी.मोरया मैया आणि श्रीगुरुदेव घेऊन जाणार आहेत.चिंता अजिबात नाही.

    उत्तर द्याहटवा
  5. सांगितलेला अनुभव इतका छान आहे की आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो आसे वाटते.व मन गुरु चरणी लीन होते.छान वाटले.

    उत्तर द्याहटवा