रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

प्लेटलेट्स दान (platelets donation) श्रेष्ठ दान!


प्लेटलेट्स दान (platelets donation) श्रेष्ठ दान!

प्रस्तावना : 
आपण रक्तदान, अवयव दान अगदी देहदानही ऐकले असेल. पण प्लेटलेट्स दान यासंबंधी फार कमी जनजागृती झालेली आढळते. खालील लेख तुम्हाला प्लेटलेट्स दानासंबंधी यथासांग माहिती देऊन त्याचे महत्त्व तुम्हाला पटवून सांगेल.

गेल्या गुरुवारी मला एका स्वयंसेवी संस्थेकडून platelets donation चा कॉल आला. खूप वर्षांपूर्वी मी तसा फॉर्म भरला होता. दुसऱ्या दिवशी कामावर तसे कळवून मी सकाळीच चर्नी रोडच्या हरकिसनदास हॉस्पिटलला पोहोचलो. सर्वप्रथम त्यांनी माझी प्राथमिक तपासणी म्हणजे वजन इत्यादी केली. त्यानंतर माझे थोडे रक्त काढून रक्तपसणीसाठी पाठवण्यात आले. या रक्तपासणीत रक्तदात्याला कावीळ/कॅन्सर/AIDS/गुप्तरोग आहे का, तपासले जाते. 

रक्ततपासणीचा निकाल यायला अर्धा तास होता. त्यावेळात मला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. माझ्याही मनात platelets donation संबंधी ज्या शंका होत्या त्यांचे मी निरसन करुन घेतले. यापूर्वी रक्तदान अनेक वेळा केले असले तरी platelets donationची ही पहिलीच वेळ! त्यामुळे उत्सुकता होती. डॉक्टरांकडून सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे घेऊन आणि त्या प्रक्रियेच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्यानंतरच मी संमती दिली. आता आपण platelets donation म्हणजे नक्की काय आणि नेहमीच्या रक्तदानापेक्षा काय वेगळे असते हे जाणून घेऊ.

प्लेटलेट्स दान प्रक्रिया:
सामान्य रक्तदानात(whole blood donation) आपले 300-350 मिली रक्त काढले जाते. पुढे ते केंद्रपसारी संयंत्रात (centrifuge machine) फिरवले जाते ज्यामुळे रक्तातील लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे घटक वेगळे केले जातात. ते तीन वेगवेगळ्या रुग्णांना दिले जाऊ शकतात. म्हणूनच तर 'एक रक्तदान तीन जीव वाचवते' असे म्हणतात!

पण कॅन्सर, मलेरिया इ. रोगांमध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते आणि रुग्णाच्या जीविताला धोका उत्पन्न होतो. यावेळी भरपूर प्रमाणात प्लेटलेट्सची आवश्यकता असते, जी एका रक्तदात्याने केलेल्या रक्तदानातून मिळणाऱ्या प्लॅटलेट्सने पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून  platelets donationची वेगळी पद्धत अवलंबिली जाते.

या प्रक्रियेमध्ये आपले रक्त 'apheresis machine' मध्ये पाठविले जाते.ही मशीन त्या रक्तातील फक्त प्लेटलेट्स काढून घेऊन बाकीचे रक्त शरीरात परत पाठविते...ही प्रक्रिया  आवश्यकतेनुसार 7 ते 8 वेळा repeat केली जाते. या पूर्ण platelets donation प्रक्रियेला एकूण एक ते दीड तास लागतो. बाकी काहीही त्रास होत नाही! इतका जास्त वेळ एकाच जागी झोपावे लागणार असल्यामुळे मनोरंजनासाठी TV/movies ची सोय असते.


                                                       (छायाचित्र : apheresis machine)

 Platelets donationची वैशिष्ट्ये : 
* तुमचे आरोग्य चांगले आहे हे तापासल्यानंतरच तुम्हाला प्रक्रियेसाठी पात्र ठरविले जाते. तसेच फक्त प्लेटलेट्स काढून बाकीचे रक्त परत शरीरात पाठविले जाते त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते.
* या प्रक्रियेमुळे तुमचे रक्त/प्लेटलेट्स कमी होत नाहीत. Platelets donation नंतर 3 दिवसांनी प्लेटलेट्स दान/ रक्तदान करू शकता. रक्तदान (whole blood donation) नंतर आपण 3 महिने रक्तदान/ प्लेटलेट्स दान करू शकत नाही.
... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे...
* तुम्ही platelets donation केल्यानंतर ते पूर्ण kit बदलले जाते त्यामुळे रक्तसंक्रमणामुळे होणारया रोगांची भीती राहत नाही.

हा लेख लिहिण्याचा मुख्य हेतू हाच की केवळ अज्ञान किंवा गैरसमजांमुळे रक्तदानासारख्या पवित्र कार्यापासून आपण दूर राहू नये. आजच्या प्रगत युगातही एकूण पात्र दात्यांपैकी केवळ 2% माणसे रक्तदान करतात. platelets donation बद्दल तर क्वचितच कोणाला माहित असेल.
खरंच आपण जेव्हा हे platelets donation करू तेव्हाच आपल्याला देवाने दिलेल्या सुदृढ शरीराचा सदुपयोग केल्याचे समाधान मिळते.

...तर मग चला करूया प्लेटलेट्स दान!


                                                            (छायाचित्र : प्लेटलेट्स दान)

।।अंबज्ञ।।

३ टिप्पण्या: